पुणे दि .27 : – युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत फिट इंडिया फ्रीडम रन हा नवीन उपक्रमाचे 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी कळविले आहे.धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्रय आहे. त्यास नेहमी तंदुरुस्त फिटनेस नियमित व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजारापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020या कालावधीत राबविण्याचे कळविण्यात आले आहे. तुम्ही कोठेही,कधीही पळु शकता अथवा चालु शकता अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.
प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, अनुकूल वेळ निवडू शकतात. आवश्कतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेवूनही धावणे, चालण्याची मुभा असणार आहे. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे, चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलित किंवा कोणत्याही ट्रॅकिंग, ॲप किंवा जीपीएस घडयाळाचा वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे. जिल्हयातील नागरिक, शिक्षक, संस्था, क्रीडामंडळे यांनी www.dsopune.com या वेबसाईट वरील लिंक मध्ये रजिस्टर करुन आपली वैयक्तिक माहिती ( स्वत: धावल्याची माहिती सदर विंडोमध्ये उदा.नाव, ई मेल, धावण्याची अथवा चालण्याची तारीख, अंतर इ) भरावयाची आहे. ही माहिती भरल्यानंतर सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र सांगता झाल्यावर ई-मेल द्वारे प्राप्त होणार आहे. हा उपक्रम राबविताना सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
राज्यात 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद ( हॉकीचे जादूगर ) यांचा जन्मदिन असल्यामुळे प्रतिवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. तर या दिनाचे ऑचित्य साधुन फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरीक, खेळाडू, महिला, पुरुष यांनी सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, विजय संतान यांनी केले आहे.