पुणे, दि ८ – विजय रणस्तंभ येथे १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी असंख्य नागरिक येत असतात. पेरणे येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या. पेरणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. १ जानेवारी रोजी होणा-या अभिवादन कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रशासनाच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, संदीप जाधव, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, 1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्न होण्यासाठी. गेल्या वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी योग्य नियोजन करुन आपआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत रित्या पार पाडाव्यात. या ठिकाणी संबंधीत अधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था, अखंडीत वीज, शुध्द पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलीस विभाग यांनीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. असेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आढळून आल्यास ते पोलीस विभागाच्या निर्दशनास आणून द्यावे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र जवळ ठेवावीत. सोशल मिडीयावरुन नेहमी चुकीचा संदेश प्रसारित होत राहातात त्यांच्याविरुध्द पोलीस प्रशासनाचे लक्ष असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. १ जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्न होण्यासाठी आपण सर्व जण सज्ज आहोत हे आपण आपल्या नियोजनातून दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले.यावेळी सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.