पिंपरी पुणे दि १२ : – मंगळवारी सकाळी ११,३० वाजताच्या सुमारास हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात नो पार्किंगमधील पिकअप गाडी पार्क केली होती. या गाडी वाहनास लावलेला जॅमर काढण्यासाठी दोन जणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
गणपत पांडुरंग मालपोटे (वय ४५) आणि किरण छबन मालपोटे (वय ३०, दोघेही रा. कातरखडक ता. मुळशी) अशी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी अमोल जनार्धन बनसोडे (वय ३२) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे हे हिंजवडीच्या शिवाजी चौक परिसरामध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी पीएमपीएमएल बस स्टॉपजवळील नो पार्किंग फलकाजवळ आरोपीने मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आपली पिकअप गाडी पार्क केली. या गाडीला फिर्यादी बनसोडे यांनी जॅमर लावला. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने ‘तू गाडीचा जॅमर काढ’, असे एकेरी भाषेत सांगितले. त्यावेळी पोलिसांनी ‘तुम्ही चलन पेड केल्यास जामर काढतो’ असे सांगितले त्यावेळी आरोपी शिवीगाळ करत अंगावर धावून आले. तसेच पोलिसांच्या वर्दीला पकडण्याचा प्रयत्न केला. ‘तुला बघून घेतो, तुझी नोकरी घालवतो, अशी धमकीही आरोपींनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिठे करीत आहेत.