पुणे,दि.०५ :- पुण्यातील वानवडी, हडपसर, कोंढवा परिसरातील वन खात्याची व इतर सरकारी मालकीची जमिनीची बेकादेशीर विक्री करणार्या गुन्हेगारावर पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी एम. पी. डी. ए.कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. अशा प्रकारे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये लोकांची व शासनाची फसवणूक करणार्यावर प्रथमच कारवाई झाली आहे.राज गुलाब शेख (वय २९, रा. इंदिरानगर, हांडेवाडी रोड, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने साथीदारांसह वानवडी, हडपसर व कोंढवा परिसरात वन खात्याची व इतर सरकारी मालकीच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री, खंडणी, दुखापत, दुखापतीसह दंगा, शासनाच्या मालकीची जागा विकून फसवणूक, घराविषयक आगळीक, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे या सारखे ७ गुन्हे दाखल होते.या परिसरात त्याच्या गैरकृत्यांमुळे लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झालेला असून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.त्यामुळे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड पी़ सी़ बी़ गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन राज शेख याला एक वर्षासाठी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. गेल्या दीड वर्षामध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ५८ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.