पुणे, दि. २५ : नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यात अपघात टाळण्याच्यादृष्टीने त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.
जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्रामगृह पुणे येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे रोशन जोश आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, या महामार्गावर उतार येण्याआधी वाहनचालकांना सावध करण्यासाठी रस्त्यावर फलक लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील चेक पोस्टवर सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. मोठ्या आणि लहान वाहनांसाठी रस्त्यावर वेगवेगळे मार्ग असावेत त्यासाठी ट्रक, कार इत्यादी वाहनांचे चिन्हे, फलक लावावेत.
लोकसंख्येबरोबरच वाहतूक वाढत असल्याने त्यादृष्टीने भविष्यातील आवश्यक नियोजन करावे. हद्दींचा प्रश्न उपस्थित न करता सर्व विभागांनी समन्वयाने कामे मार्गी लावावीत. आधीच्या आराखड्यातील मंजूर कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. नवले पुलावर प्रवाशांसाठी स्काय वॉक उभारण्यात यावे. रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस तसेच पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीत या महामार्गावर झालेल्या अपघातांची व केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
सेव्ह लाईफ फाउंडेशनचे रोशन जोश यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीस पिंपरी-चिंचवड मनपा, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, परिवहन महामंडळ तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.