पुणे,दि.१२ :- पुणे शहरात दिनांक १६ व १७ जानेवारी २०२३ मध्ये G-20 बैठक होणार आहे. या बैठकीत G-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येत आहे. परंतु वॉल पेंटिंग व सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी नागरिक तंबाखू व गुटखा किंवा पान खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
या विशेष पथकामार्फत आत्ता पर्यंत एकूण १२३ केसेस व र.रु. १ लाख २३ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांकडून दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली जाते त्या नागरिकांकडून थुंकलेल्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली जात आहे. शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकविण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा थुंकल्यास महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
पुणे शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकवण्यसाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा
थुंकल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली
जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.
अशी केली कारवाई
– 10 जानेवारी 23 केसेस करुन 23 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 11 जानेवारी 29 केसेस करुन 29 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 12 जानेवारी 71 केसेस करुन 71 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 10 ते 12 या तीन दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 123 जणांवर कारवाई करुन 1 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसुल केला.