पुणे,दि.१२:- पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल मध्ये साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पबविरुद्ध पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार येथे शनिवारी (दि.११) कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी १ लाख १० हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, व डीजे मिक्सर जप्त केले आहे
आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई केली जात आहे. डेझर्ट वॉटर रेस्टारंट अॅण्ड बार’मध्ये रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे पेट्रोलींग करत असताना पथकाच्या निदर्शनास आले.
त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले.तसेच या हॉटेलच्या मालक व मॅनेजरवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, जमदाडे व कोळगे यांच्या पथकाने केलेली आहे.