पुणे दि,१६: -राज्यात दरवर्षी 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंगू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जनतेस प्रभातफेरी, प्रदर्शने, रांगोळी स्पर्धा, चर्चा सत्रे, मुलाखती, पोस्टर्स, बॅनर्स,हस्तपत्रिका व डिजीटल सोशल मीडियाद्वारे आरोग्य शिक्षण व डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात येते. राज्यात 1 जानेवारी 19 पासून 586 डेंग्यू रुग्ण आढळले असून 0 मृत्यू झाले आहेत. डेंगू ताप विषाणूंमुळे होतो. या तापाचा प्रसार एडीस इजिप्ती नावाच्या डासांच्या दूषित मादी मार्फत होतो. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, भूक मंदावणे, त्वचेखाली वा नाकातून रक्त येणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे अशी डेंग्यू तापाची लक्षणे असतात.
डेंग्यू नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना राबविण्यात येतात- प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताप रुग्ण सर्वेक्षणात ताप रुग्णांचे रक्तनमुने हिवतापासाठी अदूषित आढळल्यास लक्षणांनुसार त्यांचे डेंग्यू करीता रक्तजल नमुना घेऊन राज्यातील 42 सेंटिनल सेंटर्स व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे मोफत तपासण्यात येतो. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियमित गृहभेटी 10 टक्के घरातील कीटकशास्त्रीय संरक्षणात अंतर्गत डास व डास अळी घनतेची पाहणी करण्यात येते व त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. डास अळी घनता वाढलेल्या भागात त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे., शहरी भागात डेंगू उद्रेकग्रस्त ठिकाणी किटकनाशकाची घरोघर धूरफवारणी. जीवशास्त्रीय उपाय योजनेअंतर्गत विभागात गप्पीमासे पैदास केंद्रांची निर्मिती करण्यांत आली आहे. डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळीभक्षक गप्पीमासे सोडण्यात आलेले आहे. आरोग्य संस्थांना आवश्यक तो औषधांचा पुरवठा व जिल्ह्यांना कीटकनाशके, अळीनाशके व साहित्य सामुग्रीचा पुरवठा. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण. विविध माध्यमांद्वारे जनतेस आरोग्य शिक्षण. अतिशीघ्र प्रतिसाद पथक हे तात्काळ उपाययोजनांच्या मार्गदर्शनासाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी भेटी देतात. उद्रेकग्रस्त ठिकाणी साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करतात. शालेय व महाविद्यालयीन मुलांमार्फत डेंग्यू प्रतिबंधात्मक योजनांबद्दल जनजागृती करणे. वरिल प्रमाणे किटकजन्य आजार नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्यामुळे राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. असे पुणे हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे