मुंबई दि, ११ :- जागतिक वाहतूक कोंडीत मुंबईच्या वाहतूक कोंडीचा पहिला नंबर लागला आहे. वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिका आणि रुग्णांना बसतो. याच पार्श्वभूमीवर एक नवी संकल्पना समोर आली आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना वेळेआधीच निघावे लागते. मात्र ते करूनही वेळेत पोहचणार की नाही याची खात्री कुणालाच नसते. या वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त फटका रुग्णवाहिकांना बसतो. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि त्यातून मार्ग काढत रुग्णालयापर्यंत रुग्णाला पोहचण्यात उशीर होतो. अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकांसाठी हरित पट्टा ही संकल्पना मुंबई वाहतूक पोलिसांनी समोर आणली. यामुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचते आणि रुग्णाला जीवनदान मिळते. मात्र सर्व रुग्णवाहिकांसाठी हा प्रयोग करणे कठीण असल्याने यलो कॉरिडोअर अर्थात पिवळा पट्टा हा संकल्पना पुढे येते आहे. राजावाडी रुग्णालयाच्या दक्षता समितीवरील प्रकाश वाणी यांनी ही संकल्पना मांडली आहे.
अनेकदा गरोदर स्त्रिया, अपघातातील जखमी किंवा गंभीर रुग्णांना ठराविक वेळेत तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. अशावेळी रुग्णालयातील मुख्य डॉक्टर तशी कल्पना वाहतूक मुख्यालयात देतील. रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन निघताना त्या रुग्णवाहिकेच्या पुढे वाहतूक अंमलदार असतील. ते पुढील सिग्नलला किंवा नाक्यावर तशी कल्पना देतील आणि रुग्णवाहिकेला मार्ग करून देतील. कंट्रोल रुमद्वारे सिग्नलचा वेळ वाढवून ती रुग्णवाहिका लवकर पोहचण्याची तजवीज करतील. यावर कंट्रोलकडून देखरेख करता येईल.
पिवळ्या पट्ट्यामुळे वाहतूक कोंडी असली तरी रुग्णवाहिका वेळेत पोहचेल आणि त्या रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होईल. मात्र यासाठी जनतेनेही सहकार्य करणे गरजेचे आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी मुंबई