मुंबई, दि. १७ : – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. अशा पर्यटनस्थळांचा पर्यटनदृष्ट्या सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर “पर्यटन गुडविल अम्बेसीटर” म्हणून काम करावे, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले.कार्ला, ता. मावळ, जि. पुणे येथील पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास येथे आज राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांची
पर्यटन विकासावर कार्यशाळा आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील अप्पर आयुक्त उपस्थित होते.महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट राज्य असून देश व परदेशातील पर्यटकांना सर्वस्पर्शी पर्यटनाच्या व्यापक संधी राज्यात उपलब्ध आहेत. निसर्गाने राज्याला भरभरून नैसर्गिक संपदा दिली आहे. राज्यातील गडकिल्ले, जागतिक वारसास्थळे, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन, समुद्र किनारे, प्राचीन मंदिरे, बॉलिवूड पर्यटन अशा विविध प्रकारच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर आहे. जागतिक स्तरावरही विभागामार्फत पर्यटन सहकार्य बाबत प्रयत्न होत आहेत, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.मंत्री श्री. रावल पुढे म्हणाले की, पर्यटन हे व्यापक रोजगार निर्मितीचे क्षेत्र आहे. ग्रामीण
मोठ्या प्रमाणावर पर्यटनवाढीला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण होणार आहे. विविध फेस्टिव्हल आयोजन करून पर्यटनाला चालना व पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती होत आहे. अनेक तरुणांना या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाढत्या पर्यटन विकासाबरोबरच पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधा निर्मितीवर ही भर द्यावा लागेल. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी व महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.दुसऱ्या सत्रात मंत्री श्री. रावल यांनी जिल्हास्तरावर पर्यटन विषयक माहिती एकत्रित करून मॅप तयार करणे, राज्यस्तरावर विस्तृत माहिती पाठवणे, जिल्ह्यात पर्यटन महोत्सव घेणे, जिल्हा नियोजन विभागातील पर्यटन निधी वापरणेसाठी पर्यटनस्थळे सुचवणे, वर्षातून एक कॉन्फरन्स आदीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी प्रादेशिक पर्यटन धोरण 2016 चे सादरीकरण संचालक दिलीप गावडे यांनी केले. सादरीकरणात जगात-देशात पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचे स्थान, पर्यटन निवास, मंजूर कामांची संख्या, तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेची माहिती देण्यात आली. आयुक्त श्री दीपक म्हैसेकर, इस्कॉनचे श्री गोरांगदास प्रभू, सगुणा बागेचे चंद्रशेखर भडसावळे, मनोज हाडवरे आदींनी मनोगतात राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याबाबत मार्गदर्शन केले.