पुणे दि ०२ :- ससून रुग्णालयात आईनेच मुलाला मूत्रपिंड दान करुन जणू काही त्याला पुन्हा एकदा नवीन जीवन दिले आहे. दि. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी ससून रुग्णालयात ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. ससूनमधील हे जिवंत दाता असलेले आठवे तर एकूण अठरावे मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेला २४ वर्षीय तरुण हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. तो “क्रॉनिक किडनी” आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे गेल्या ९ महिन्यांपासून डायलिसिस उपचार घेत होता. तज्ञ डॉक्टरांनी त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असता त्याच्या ५२ वर्षीय आईने तिचे मूत्रपिंड दानाकरिता संमती दर्शविली.व महाविद्यालयीन तरुण असलेल्या रुग्णाचे वडील शिपाई म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी रुग्णालयातील खर्च परवडत नव्हता म्हणून ससूनमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.आहे ससूनचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले म्हणाले कि “कुशल वैद्यकीय तज्ञ व अत्याधुनिक उपकरणांनी ससून सुसज्ज होत असल्यामुळे या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. दानशूर
व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी ससूनला देणगी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. ससूनला दिलेल्या देणगीवर “८० जी ची सुविधा उपलब्ध आहे”.अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात मूत्रपिंड रोगतज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, डॉ.राजेश श्रोत्री, डॉ.अभय सदरे, डॉ.शशिकला सांगळे, डॉ.निरंजन आंबेकर, डॉ.संदीप मोरखंडीकर, डॉ.धनेश कामेरकर, डॉ.हर्षद तोष्णीवाल, डॉ.शंकर मुंढे,डॉ. हृषीकेश कोरे भूलतज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ.योगेश गवळी यांचा समावेश होता. त्यांना कविता अभंग, फरीदा शेख, अनिता दिंडाल या परिचारिकांचे सहकार्य लाभले. अवयव प्रत्यारोपण समन्वयक अर्जुन राठोड यांनी मोलाची मदत केली.आहे