पुणे दि २७ : – पुण्यासह संपूर्ण राज्यात नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष यंदाही रात्रभर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्लबमध्ये 31 डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री व करमणूक कार्यक्रमांना मुभा देण्यात आली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. हॉटेल्स, पब्स, क्लबमध्ये वेगवेगळ्या थिम्स घेऊन पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
मद्य, भोजनाच्या आस्वादासमवेत करमणुकीचे कार्यक्रमही आखले जात आहेत. नववर्ष स्वागताच्या या आनंदात कोणतेही विरजन पडू नये यासाठी इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनने हॉटेल्सची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.
या मागणीनुसार पुणे, मुंबई, नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात 31 डिसेंबरला रात्री दीडऐवजी पहाटे 5 वाजेपर्यंत जल्लोष करण्यास परवानगी दिली आहे. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्लब, पबमध्ये मद्यविक्रीही करता येणार आहे.