पुणे दि २७ :- व्यावसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोल्डन ट्युलिप इव्हेंट्सतर्फे ‘घे भरारी’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन केले आहे. दि. ३ ते ५ जानेवारी २०२० या दरम्यान डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-यदलाबादकर, संदीप चाफेकर, समीर देशपांडे पत्रकार परिषदेत दिली.
राहुल कुलकर्णी म्हणाले, “प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी १२ वाजता माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. नोकरी सोडून लोकांनी हळुहळु व्यवसायात उतरावे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. नोकरी सांभाळून जे लोक व्यवसाय करतात अशांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, टुर ट्रॅव्हल्स, लाईफ इन्शुरन्स, होम ऍटोमेशन, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हॅण्डमेड दागिन्यांपासून मराठीमधून संदेश लिहलेल्या टिशर्टपर्यंत असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य जत्रेसह ग्राहकांना गेम्स आणि शॉपिंगचा आनंद घेता येईल. या महोत्सवात पुणेकर खवैय्यांना महाराष्ट्रीय खाद्यांची चव चाखता येणार आहे. शिवाय, भरपूर खेळ, जादूचे प्रयोग, गायनाचे कार्यक्रम व चैताली माजगावकर यांचा ‘पपेट शो’ अनुभवता येणार आहेत. यातील गेम शो मध्ये लहान मुलांसाठी निरनिराळी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. चाळीस पेक्षा अधिक कुल्फीचे प्रकार आणि इतर अनेक पदार्थ व वस्तूंची रेलचेल असणार आहे.
कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शोचा कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. मनीषा निश्चल यांच्या गाण्यांची मैफल रंगणार आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन व एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि धम्माल गेम्स अनुभव येणार आहेत. जवळपास १२५ पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. पाटणकर इव्हेंट्स, चीझी क्रेझी, गिरीवन रिसॉर्ट आणि चौगुले मोटर्स यांचे प्रायोजकत्व आहे, पाटणकर इव्हेन्टतर्फे येणाऱ्या विशेष व्यवसायिकांचा आणि सेलिब्रिटी चा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सत्कार करणार आहेत. या प्रदर्शनात त्यांच्या तर्फे लग्न आणि मुंज यांच्या विविध सजावटींच्या संदर्भात माहिती देण्यात येईल. या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण मतिमंद पुनवर्सन केंद्राचा स्टॉल असणार आहे. यामध्ये जुन्या कपड्यापासून केलेल्या पिशव्या, पायपुसणी यासह विविध अन्य प्रकार विक्रीसाठी ठेवणार आहेत. तसेच कोल्हापुरातील इचलकरंजी येथील मुक कर्णबधीर वरुण बरगाळे यांचा अडॉरेबल व्हाईट कलेक्शन असा आगळा वेगळा स्टोल असणार आहे. ख्यातमान वादक उमेश्वर भुवन हे कहोन हे जागतिक संगीतात वापरले जाणारे वाद्य याविषयी कार्यशाळा घेणार आहेत, असेही राहुल कुलकर्णी यांनी नमूद केले.