पुणे दि.४- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व प्रहार अपंग क्रांती आंदोलन वाघोली नं.१ ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, ता.हवेली.जि.पुणे येथे सकाळी १० वाजता फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन असून, इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक अ.उ.पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्हयातील पुणे शहर, रांजगणगाव, सणसवाडी, चाकण या औद्योगिक परिसरातील एकूण -१८ उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण-७९६ रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे फक्त अस्थिव्यंग, मुक व कर्णबधीर उमेदवारांकरीता नोंदविण्यात आलेली आहेत.
जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बेराजगार उमेदवारांना चांगले रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. किमान १० वी, १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई इ. शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या आणि फक्त वरील प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांनी रविवार, दि. ९ डिसेंबर रोजीच्या मेळाव्याअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, आपला अपंगत्वाचे प्रमाण व प्रकार दर्शविणारा अपंगत्वाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणाव्यात, असेही सहायक संचालक श्रीमती पवार यांनी कळविले आहे.