मुंबई :- महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागामध्ये असणा-या आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना एकात्मिक आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने “अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवनदायिनी” या योजनेचा आज मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन परिसरात शुभारंभ करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती मा.ना.श्री.रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री अम्ब्रीशराव अत्राम, राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन व आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा आदि मान्यवर देखील उपस्थित होते. ही योजना मराठी उद्योजक आणि बी.व्ही.जी चे संस्थापक, अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्या बी.व्ही.जी. (भारत विकास ग्रुप) संस्थेकडून राबविण्यात येत आहे.
ह्या योजनेअंतर्गत एकूण ४८ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास तैनात असतील. त्याचबरोबर ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ सह सज्ज असणा-या या रुग्णवाहिकांमध्ये ‘आयुष’ २४ तास उपलब्ध असतील. त्याचबरोबर आरोग्य तपासणी संबंधीच्या अनेक गोष्टींचा ह्या योजनेत समावेश असेल. त्यामुळे ‘’महाराष्ट्राने पुढाकार घेऊन आखलेली ही योजना इतर राज्यांसाठी आदर्श व उपयोगी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच ह्या योजनेमुळे आदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलेल असेही त्यांनी ह्या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, तळोदा, यावल, नंदुरबार, धुळे, राजूर, किनवट, पांढरकवडा, धारणी, कळमनुरी, नागपूर, गडचिरोली, अहेरी व भामरागड या एकूण १४ ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी होईल. ही योजना बी.व्ही.जी चे आपत्कालीन वैद्यकिय सेवेचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शेळके व BVG चे प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. किशोर देव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.