गोवा दि २० :- अभिनेत्री आर्या वोरा फेमस ट्रॅवल ब्लॉगर आहे शिवाय ती उत्तम फॅशन आणि लाईफस्टाईल ब्लॉगरही आहे. तिच्या युट्यूब व्हिडीओजना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. ‘देवों के देव महादेव’ टेलिव्हिजन मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते. कमीवेळेतच तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोवरचे प्रमाण प्रचंड वाढले.
आपल्या व्हिडीयोब्लॉगव्दारे आपल्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आर्याने लॉकडाऊननंतर सावधानता बाळगत उदयपूर, अमृतसर, हिमाचलप्रदेश आणि गोव्यात सोलो प्रवास केला. त्याविषयी ती सांगते, “गोव्यात मी ब-याचवेळा फिरायला जाते. परंतु ह्यावेळेस मी फक्त दक्षिण गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी गेले होते. तिथे मी कधीही न पाहिलेल्या स्थळांना भेटी दिल्या. दोन मनमोहक धबधबे तसेच ईसायकलिंग करून ट्रेकींग केली त्याचसोबत बंजी जंपींगही केले. मला नविन ठिकाणी शुट करताना खूप धमाल आली.”
गोव्यातील बंजी जंपींगच्या थराराविषयी ती सांगते, “गोव्यात समुद्रकिनारे, चर्च, क्रूज व्यतिरिक्त बंजी जंपींगही आहे हे सहसा कोणाला माहित नाही आहे. मलाही बरंच संशोधन केल्यानंतर समजलं. मी पहिल्यांदा १०० मीटरचं बंजी जंपींग बॅंकोकमध्ये केलं होतं. त्यांतर २०१७ साली मी अमेरिकेतील लासवेगासमधील सर्वात उंच इमारतीतून बंजी जंपींग केलं होतं. आणि आता गोव्यात मी ५० मीटरला बंजी जंपींग केलं. हा अनुभव माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. मला असे अदभुत एडवेंचर करायला फार आवडतात.