पुणे दि. ०६ : – खेलो इंडीया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्या.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडीया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट व शिक्षण क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी श्री तावडे बोलत होते.
या बैठकीला विभागीय आयुक्त तथा यशदाचे महासंचालक आनंद लिमये, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे उपमहासंचालक संदीप प्रधान, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल उपस्थित होते.
श्री. विनोद तावडे म्हणाले, देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय वयोगटांच्या खेळाडूंना चालना मिळावी, तसेच येणाऱ्या ऑलंपीक स्पर्धेत भारताच्यावतीने खेळण्यासाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करून इतर राज्यांसमोर महाराष्ट्राने आदर्श निर्माण करावा. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे शालेय वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची वाढीव जबाबदारी आपल्यावर आहे. संयोजन समितीने अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
या स्पर्धेच्या आयोजनात आरोग्य विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून क्रीडा प्रकारांच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्यासमोर आपल्या राज्याची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचे माहिती दिली. या बैठकीला केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मैदानांची आणि खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांनी काही सूचना संयोजन समितीला केल्या.