पुणे दि २ :-पुणे शहर वाहतूक पाेलिसांनी पुणेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी काही व्हिडीओ तयार केले असून या व्हिडीओच्या माध्यमातून जन जागृत करण्याचे काम पुणे ट्रॅफिक पोलीस साेशल माध्यमांमधून हे व्हिडीओ नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात येणार आहेत.
पुण्याची लाेकसंख्या गेल्या काही वर्षात कमालीची वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक देखील माेठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यातच पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याने वाहतूक काेंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. असे असताना वाहतूक नियम ताेडणाऱ्यांमुळे अनेकदा वाहतूक काेंडी हाेत असते. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. वाहतूक पाेलिसांच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी २०१८ मध्ये शहर परिसरात २७ प्राणांतिक अपघात झाले हाेते. त्यामुळे वाहतूक पाेलीस सातत्याने अपघातांची संख्या कमी करण्याकडे लक्ष देत हाेते. त्यासाठी विविध स्तरातून जनजागृती बराेबरच नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. त्याचा परिणाम हा जानेवारी २०१९ मध्ये दिसून आला. या महिन्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १५ वर आली आहे. हे प्रमाण मागच्यावर्षीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच एक जानेवारीपासून वाहतूक शाखेकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. याला अनेकस्तरातून टीका हाेत असली तरी या कारवाईचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर हाेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या अनेक नागरिक हेल्मेट वापरण्यास प्राधाण्य देत आहेत.
वाहतूकीच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक पाेलिसांकडून १४ जनजागृतीपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. येत्या काळात विविध साेशल माध्यमांमधून हे व्हिडीओ नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात येणार आहेत. या माध्यमातून वाहतूकीचे सर्व नियम पाळणारा हाच खरा पुणेकर असल्याचा संदेश देण्यात आला आहे. या व्हिडीओमधून फुटपाथवरुन वाहणे नेऊ नका, वाहनचालवताना माेबाईलचा वापर करु नका, झेब्रा क्राॅसिंगवरुनच रस्ता ओलांडावा, चारचाकी चालवताना सीटबेल्ट वापरावा असे विविध संदेश देण्यात आले आहेत. पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत