पुणे,दि.०५:- पुण्यातील कासेवाडी येथिल मा. नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असुन ३० लाख रुपये मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भवानी पेठेत मंगळवारी दुपारी ३ ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस फिर्याद दिली आहे. फिर्यादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. ते मंगळवारी दुपारी घरी असताना त्यांना एकाने फोन करुन व मेसेज करुन गोळ्या घालून ठार माण्याची धमकी दिली. आम्ही सात जण आहोत. आमच्यातील दोघांना आत टाकले तरी इतर जण तुझ्या घरी व कार्यालयाबाहेर असतो, असा मेसेज पाठविला. तसेच निवडणुकीमध्ये उभे न राहण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकारानंतर बागवे यांनी तातडीने गुन्हे शाखेशी संपर्क करुन माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मानकर अधिक तपास करीत आहेत.