पुणे दि ०७ :- “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होण्यापूर्वीची विवादित कर प्रकरणे निकाली काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. प्रलंबित प्रकरणे निकाली लागावीत, यासाठी या योजनेंतर्गत विविध कर सवलती दिल्या जात असून, येत्या ३१ डिसेम्बरपर्यंत ही योजना राबविली जात आहे. विवादित प्रकरणे निकाली लावण्यात ‘सबका विश्वास’ उपयुक्त ठरेल,” असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटी आयुक्त पुणे परिमंडळ- २ राजीव कपूर यांनी केले.दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभाग आणि जीएसटी व इन्डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने ‘सबका विश्वास (पारंपरिक वाद निर्मूलन) योजना’ आणि ‘जीएसटी नवीन परतावा प्रणाली’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात राजीव कपूर बोलत होते. यावेळी सीजीएसटी उपायुक्तहिमानी धमीजा,अमित श्रीवास्तव, ‘आयसीएआय’च्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार काशिनाथ पठारे, सदस्य राजेश अगरवाल, सीए राजेश शर्मा, सीए स्वप्नील मुनोत आदी उपस्थित होते.राजीव कपूर म्हणाले, “केंद्र सरकारने ‘एक देश एक कर’ धोरण अवलंबत जीएसटी लागू केला. तत्पूर्वी विविध प्रकारचे कर अस्तित्वात होते. त्यामध्ये लाखो कोटी रुपयांचीअनेक प्रकरणे विवादित आहेत. ‘जीएसटी’मध्ये सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी कायद्यात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. येत्या काळात जीएसटी अधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, करदात्यांनी आपली पूर्वीची प्रकरणे निकाली काढून ‘जीएसटी’ला आपलेसे करावे. करदात्यांच्या करप्रणालीविषयक शंका निरसन करण्यासाठी, तसेच अभिप्राय घेण्यासाठी विभागामार्फत नियमित जागृतीपर सत्रे आयोजिली जात आहेत. त्याबद्दलची माहिती ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.” हिमानी धमीजा म्हणाल्या, ”अधिकाधिक करदात्यांपर्यंत ही ‘सबका विकास’ योजना पोहोचायला हवी. जी काही विवादित प्रकरणे असतील, ती सगळी निकाली लावण्यासाठी जीएसटी विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत सनदी लेखापालांचीही भूमिका महत्वाची असून, त्यांनी आपल्या करदात्यांना याची माहिती देऊन ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया करावी. यामध्ये अडचणी आल्या, तर विभागाकडे संपर्क साधावा. ही प्रकरणे निकाली लावण्यासाठी सवलतीही दिल्या जात आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत असलेल्या या योजनेचा अधिकाधिक करदात्यांच्या लाभ घ्यावा व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी, असे वाटते.”हिमानी धमीजा यांनी ‘सबका विश्वास’ योजनेबद्दल पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दिले. ही योजना नेमकी कशी आहे, करदात्यांनी नोंदणी कशी करावी, याविषयी माहिती दिली. सीए स्वप्नील मुनोत यांनी जीएसटी रिटर्न्स भरण्याची नवीन प्रक्रिया समजावून सांगितली.सीए ऋता चितळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले.
——————————
इन्फोबॉक्स
‘सबका विश्वास’विषयी अधिक माहिती’सबका विश्वास’ योजनेची सविस्तर माहिती https://www.youtube.com/watch?v=_4_H67Ft3HI यावर, तसेच https://cbic-gst.gov.in/sabka-vishwas.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी १८००-१२००-२३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिमानी धमीजा यांनी केले.