पुणे दि ०९ :- तीन दिवसांची पोलीस महासंचालक परिषद (डीजी कॉन्फरन्स) काल पुण्यात संपली. सलग दोन दिवस स्वत: पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती हे या परिषदेचे वैशिष्टय ठरले. सकाळी नऊ ते रात्री साडेअकरा पर्यंत चालणारी परिषद पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची अखंड उपस्थिती व देशाच्या सुरक्षेची काळजी वाहणारे सर्वोच्च १८५ आधिकारी सलग तीन दिवस पुण्यात होते.दरवर्षी होणारी पोलीस महासंचालक यावर्षी पुण्यात झाली. या परिषदे दरम्यान दोन रात्री व दोन दिवस पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा पुण्यात मुक्कामाला होते.पुण्यात राजभवनात त्यांनी मुक्काम होता. गुप्तचर विभाग (आयबी), रिसर्च ऍण्ड ऍनिलिसिस विंग (रॉ) तसेच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आणि सर्वोच्च असलेल्या संस्थांचे प्रमुख, सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक या परिषदेला उपस्थित होते.या सर्वांच्या मुक्कामाची व्यवस्था आयसर व यशदाच्या विश्रामगृहात करण्यात आली होती. या परिषदेसाठी पुणे पोलीस, राज्य गुन्हे अन्वेषण विभागासह सर्वच आधिकारी परिषदेच्या आयोजनात आघाडीवर होते. “आयसर’च्या आवारात झालेल्या या परिषदेच्या निमित्ताने या साऱ्या परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था होती. दोन दिवसांच्या वास्तव्यात पंतप्रधान मोदी यांनी परिषदेच्या ठिकाणी असलेले जेवण घेतले. सकाळचा चहा,नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण त्यांनी सर्व आधिकाऱ्यांसोबतच घेतले. परिषदेच्या संपूर्ण काळात फक्त शाकाहारी जेवणाची व्यवस्था होती. जास्तीत जास्त वेळ आधिकाऱ्यांसोबत घालवला. शुक्रवारी रात्री मुक्कामाला पुण्यात आल्यानंतर गृहमंत्री व सर्व आधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी आयसरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये योगासने केली.दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर रविवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना झाले.