पुणे, दिनांक १२:- डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) द्वारे खत विक्री प्रकल्प हा उपक्रम शेतकरी हिताचा असून याचा लाभ सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) द्वारे खत विक्री प्रकल्प वर्षपूर्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, प्रगतीशील शेतकरी रामचंद्र बाजीराव नागवडे, खत विक्रेते प्रतिनिधी मनोज कर्नावट, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. कटारे म्हणाल्या, गेल्या वर्षापासून हा उपक्रम सुरु झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन उपक्रम असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करतांना अडचणी येऊ शकतात, त्यावर मात करुन अधिकाधिक शेतक-यांना याचा लाभ मिळण्यासाठी कृषि विभाग, खत विक्रेते यांनी प्रयत्न करावेत. शेतक-यांना कोणत्या पिकांसाठी कोणते खत आणि किती प्रमाणात दिले पाहिजे, याचे ज्ञान दिले तर तेही उपयुक्त ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
प्रगतीशील शेतकरी रामचंद्र बाजीराव नागवडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या योजनेमुळे प्रत्येक
शेतक-याला खते मिळतात. ही योजना चांगली असून आधारकार्डबाबत शिथीलता आणता येईल का, याबाबत प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.
खत विक्रेते प्रतिनिधी मनोज कर्नावट यांनी या योजनेबाबत तालुकास्तरावर खत विक्रेत्या दुकानदारांना प्रशिक्षण दिले असून योग्य पध्दतीने खत विक्री होत असल्याचे सांगितले. इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या अडचणी असल्या तरी त्यावर मात करुन शेतक-यांना खते उपलब्ध करुन दिली जातात. हंगामाच्या काळात पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनची संख्या वाढण्याची गरज त्यांनी सांगितली.
कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी प्रास्ताविक केले. राज्यामध्ये रासायनिक खत विक्री करीता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प 1 नोव्हेंबर 2017 पासून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना रासायनिक अनुदानीत खते ही पॉस मशीनद्वारे परवानाधारक किरकोळ खत विक्रेत्यांकडून नोव्हेंबर 2017 पासून विक्री केले जात आहे. जिल्ह्यात एकूण 2200किरकोळ रासायनिक खते विक्रेते असून प्रणालीवर नोंदणी केलेल्या अनुदानित खते विक्री करणा-या एकूण 1046 किरकोळ विक्रेत्यांना पॉस मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये 1 नोव्हेंबर पासून 28 ऑक्टोबर 2018 पर्यंत पॉस मशीनमधून एकूण 2 लाख 57 हजार 492 बिलांद्वारे शेतक-यांनी एकूण 6 लाख 15 हजार 511 व्यवहाराद्वारे 3 लाख 68 हजार 897 मे. टन रासायनिक खतांची खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगितले.