_पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, पुण्यात कायद्याचे राज्य आहे का? – वकिलाच्या भावाचा संतप्त सवाल_
अपहर्त भावाची सुखरुप सुटका व्हावी यासाठी पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन
पुणे, दि. ८ : – पुणे शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील उमेश चंद्रशेखर मोरे हे १ ऑक्टोबर पासून बेपत्ता आहेत. न्यायालयात जातो असे सांगून अॅड. मोरे बाहेर पडले; मात्र घरी परतलेच नाहीत. त्यांची गाडी न्यायालयात आढळून आली आहे. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय असल्याने त्यांचे भाऊ प्रशांत चंद्रशेखर मोरे (वय 34, रा. जामखेड जि. अहमदनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या भावाने मिसिंग तक्रार दाखल केली होती. दिवसाढवळ्या न्यायलयाच्या आवारामधून एका वकिलाचे जर अपहरण केले जात असेल तर पुण्यात कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडत असल्याचे प्रशांत मोरे म्हणाले. अपहर्त भावाची सुखरुप सुटका व्हावी व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.
पर्वती येथील भूखंड प्रकरणांमध्ये पावणेदोन कोटींची लाच प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोन वर्षांपूर्वी अॅड. मोरे यांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. भूखंडाचा न्यायालयात दावा दाखल होता. त्या दाव्याचा निकाल अॅड. मोरे यांच्या बाजूने लागला होता. या रागातून आरोपींनी मोरे यांना पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती.