पुणे दि १४ :- सातारा येथील वैष्णवी पवार हिचे सोनेरी यश सातारायेथील भाजी विक्रेता संतोष पवार यांनी आपली कन्या वैष्णवी हिने आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे हे पाहिलेले स्वप्न सोमवारी साकार झाले. वेटलिफ्टिंगसारख्या आव्हानात्मक खेळात वैष्णवी हिने ८१ किलो गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली व वडिलांचे स्वप्न साकार केले. तिने स्नॅचमध्ये ५४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ६४ किलो असे एकूण ११४ किलो वजन उचलले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. आंध्रप्रदेशच्या गायत्री रेड्डी हिने अनुक्रमे ४४ किलो व ६५ किलो असे एकूण १०९ किलो वजन उचलीत रौप्यपदक पटकाविले. तामिळनाडूच्या एम.दीपा हिने ४१ किलो व ६१ किलो असे एकूण १०२ किलो वजन उचलून ब्राँझपदक जिंकले. वैष्णवी ही सातारा येथील अनंत इंग्लीश प्रशालेत ९वी इयत्तेत शिकत आहे. वेटलिफ्टिंगसाठी तिला जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.५ व्या इयत्ते पासून तिने या खेळाच्या सरावास प्रारंभ केला.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर वैष्णवी हिने सांगितले, पाचव्या इयत्तेत शिकत असताना मला या खेळाची आवड निर्माण झाली. देवकर यांनी मला या खेळाचे बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी या खेळाच्या स्पर्धांचे निरीक्षण केले. देवकर यांच्या मार्गदर्शनाचा व माझ्या आईवडिलांचे संपूर्ण सहकार्य याचा माझ्या सुवर्णपदकात मोठा वाटा आहे. शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मला येथे फायदा झाला. आॅलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे व हे ध्येय साकार करण्यासाठी मी कसोशीने कष्ट करणार आहे.
वैष्णवी हिचे सोनेरी यश पाहण्यासाठी तिचे आईवडील उपस्थित होते. तिचे वडील संतोष यांनी सांगितले, वैष्णवी ही खूप मेहनती खेळाडू आहे. या खेळासाठी लागणाºया आहाराचा खर्च भाजी विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नातूनच करीत आहे. तिच्याकडे निश्चित गुणवत्ता आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशास पदक मिळवून देईल अशी मला खात्री आहे.