फेसबुक मैत्री पडली महागात;कर्जत पोलिसांकडुन सतर्कतेचा इशारा
कर्जत दि.१६:-‘फेसबुकवर त्याला अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आली…त्याने ती खातरजमा न करता स्विकारलीही…त्यानंतर दोघात मैत्री झाली…व्हाट्सअपवर तर कधी फोनवर बोलणे सुरू झाले…मग तिकडून ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याची विनंती केली.विनंतीला प्रतिसाद देत लाखो रुपयांची गुंतवणूक केली अन् तिथेच घात झाला!
राहुलकुमार श्रीधर राऊत (मुळगाव गडहिंग्लज,कोल्हापुर) सध्या नोकरीनिमित्त (रा.राशीन ता. कर्जत) यांना राहुल नामदेव कवाडे (रा.आवळे बुद्रुक ता.राधानगरी जि. कोल्हापुर) याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.त्यानंतर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून दोघांची मैत्री झाली व बोलणे सुरू झाले. मैत्रीचा फायदा घेत कवाडे याने फिर्यादिस ‘मी ट्रेडिंग सुरू केले असुन कोणी गुंतवणूक करणार असेल तर सांगा. १ लाखाला प्रतिदिवसाला मी ५ हजार देतोय आणि रक्कम जेंव्हा परत हवी असेल तर लगेच माघारी देखील देतोय’ असे सांगुन मोबाईलवर बँक अकाऊंटबाबतची माहिती पाठवली.’तुम्ही २ लाख ३० हजार गुंतवा, मी दररोज २० हजार तुम्हाला देत जाईल व जेंव्हा सर्व रक्कम लागेल तेंव्हा परत करेल मी कुणालाही फसवले नाही’ असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.’शेअर मार्केटमध्ये नफा किंवा तोटा झाला तरी रोज २० हजार मिळतील.शेअर मार्केटचे अनेक कोर्स मी केलेले असून अनेक अधिकाऱ्यांनीही माझ्याकडे गुंतवणुक केलेली आहे’ यावर विश्वास ठेवत फिर्यादीने दि.३० ऑक्टो.२०२१ रोजी ४० हजार, दि.१ नोव्हें.२०२१ रोजी १ लाख १० हजार तर दि.२ नोव्हे.२०२१ रोजी ८० हजार असे एकूण २ लाख ३० हजार रक्कम स्वतःच्या व आईच्या खात्यावरून आरोपीच्या एच.डी.एफ.सी बँक खात्यात ट्रान्सफर केली.त्यानंतर कवडे याने मोबदला म्हणुन फिर्यादीच्या आईच्या खात्यावर दि.२ नोव्हेंबर रोजी १२ हजार व दि.३ नोव्हे. रोजी २० हजार तर दि.८ नोव्हे.रोजी २० हजार असे तीन वेळा ५२ हजार रु. दिले. त्यानंतर मात्र पैसे देण्यास विलंब करून ‘मी शेअर मार्केटचा कोर्स करण्यासाठी पुण्याला जाणार आहे,वडिलांची तब्बेत खराब आहे’ अशी कारणे देत मोबदला दिला नाही.त्यानंतर फिर्यादीने गुंतवलेली २ लाख ३० हजार रक्कम परत मागितली असता ‘आज-उद्या देतो’ करत फिर्यादीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.व त्यानंतर आरोपीने दि.११ नोव्हे. रोजी ५० हजार तर दुसऱ्या दिवशी १ लाख असे एकुण १ लाख ५० हजार पाठवले.गुंतवणुकीचे ८० हजार आणि नफ्याचे दि.८ नोव्हे. नंतरचे २० प्रमाणे येणे बाकी होते. फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीने हा सर्व प्रकार आरोपी कवडे याच्या पत्नीस फोन कॉलवर सांगितला. दि.१३ नोव्हे रोजी कवडे याने फिर्यादीच्या व्हाट्सअपवर चुकीच्या पद्धतीने मेसेज केले.यापुर्वीही फिर्यादीने गुंतवणुकीचे पैसे मागितले असता ‘मी आत्महत्या करतो आणि सुसाईड नोटवर तुझे नाव लिहितो,पुन्हा मला व माझ्या बायकोला कॉल केला तर खोटा गुन्हा दाखल करून फसवतो ‘अशी धमकी दिली आहे.कर्जत पोलिसांनी आरोपी राहुल कवाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश गावित, पोलीस अंमलदार संतोष फुंदे कर्जत पोलीस स्टेशन हे करत आहेत.
📢सोशल मिडियावर दाखवलेल्या आमिषाला बळी पडू नका!
सध्या ऑनलाईन व सोशल मिडियाच्या विविध माध्यमांवर आर्थिक फसवणुकीचे प्रकार खुप वाढले आहेत. सोशल मिडियावरील कोणत्याही अनोळखी व्यक्तींशी आर्थिक हव्यासापोटी व्यवहार करू नका.कोणतेही कष्ट न घेता तुम्हाला दुप्पट-चौपट कुणीही पैसे देणार नाहीत.पहिल्यांदा प्रामाणिक व्यवहार करून विश्वासात घेतले जाते मात्र नंतर फसवणुक होतेच त्यामुळे कुणीही कसल्याही आमिषाला बळी पडू नका.-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत