साडे सहा लाखांची मागणी;शेतकऱ्याकडून कर्जत पोलिसांचे आभार
कर्जत दि.१८:- ‘व्याजाच्या पैशांच्या बदल्यात तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावे लिहून घेत अनेक खाजगी सावकार गब्बर झाले.यात अनेकांचे संसार धुळीस मिळाले,मुलांच्या शिक्षणाबरोबरच कुटुंबाचीही वाताहत झाली.या सगळ्या चक्रव्यूहात कर्जतच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार चंद्रशेखर यादव यांनी स्विकारला अन् सावकारांना लगाम बसला.सावकारांनी व्याजात हडपलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळू लागल्या.यामुळे पोलीस निरीक्षक यादव आणि कर्जत पोलीसांवरील तालुक्यातील जनतेचा विश्वास दृढ झाला.
कर्जत तालुक्यातील भोसे येथील शेतकरी नितीन नामदेव शिरसागर यांनी त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे भोसे येथीलच एका सावकाराकडून सन २०१६ साली ३ लाख रुपये ३ टक्के रु. व्याजदराने घेतले होते.त्याबदल्यात त्या सावकाराने त्यांच्याकडून १ एकर जमीन पैसे परत देण्याच्या बोलीवर लिहून घेतली होती.त्यानंतर क्षिरसागर यांनी मध्यंतरीच्या काळात २ लाख २० हजार रुपये सावकाराला दिले. मात्र सावकार आणखी ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करत होता.’मी तुम्हाला भरपुर पैसे दिलेत,तरी आणखी ४ लाख रुपये देतो माझी जमीन मला परत करा’ अशी क्षीरसागर यांनी सावकाराला विनंती केली.३ लाखाचे ६ लाख २० हजार देत असून देखील सावकार जमीन परत करण्यास नकारच देत होता. क्षीरसागर हतबल झाल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना भेटून सर्व हकीकत सांगितली. यादव यांनी पोलीस अंमलदार सुनिल माळशिखरे, मनोज लातूरकर, अमित बर्डे, भाऊसाहेब यमगर यांना सदर सावकाराला तात्काळ बोलावून घेण्याचे आदेश दिले.यादव यांच्या धसक्याने सावकाराची बदललेली नियत भानावर आली आणि ‘मी लगेच जमीन परत करतो’ असे त्याने सांगितले.दि.१७ नोव्हेंबर रोजी सावकाराने संबंधित जमीन शेतकऱ्याला परत केली आहे.कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच अनेकांचे मातीमोल झालेले संसार कर्जत पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमामुळे पुन्हा एकदा नव्याने फुलले आहेत.या त्यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक थोडेच हे मात्र खरे!
पोलिस निरीक्षकांचे व पोलीस प्रशासनाचे मानले आभार!
‘खुप कष्टातून शक्य तेवढी रक्कम जमवुन सावकाराला देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी केलेल्या रकमेची मागणी मी पुर्ण करूच शकलो नसतो.जमीन परत मिळेल का नाही?याची खात्री वाटत नव्हती मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस प्रशासनाने मला जमीन मिळवून दिली असल्याचे सांगत क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे