नवी मुंबई ०६ फेब्रुवारी २०२२: दोन गोलची पिछाडी भरून काढत चायना पीआर संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. येथील डी वाय पाटील मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कोरिया रिपब्लिकचा ३-२ गोलने पराभव केला.
सामन्यावर वर्चस्व राखून खेळणाऱ्या कोरिया रिपब्लिक संघाने मध्यंतराला २-० गोल अशी आघाडी घेत पहिल्या विजेतेपदाकडे दमदार पाऊल टाकले होते. मात्र, उत्तरार्धात चायना पीआर संघाने कमालीचा आक्रमक खेळ करत बाजी पलटवली. टँग जिआली, झँग लिनयान आणि झिआओ युयी यांनी तीन गोल करून चायना पीआर संघाच्या नवव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोरियला पुन्हा एकदा करंडकाशिवाय परतावे लागले.
कोरिया रिपब्लिकविरुद्धच्या यापूर्वीच्या सात सामन्यात चायना पीआर अपराजित राहिले होते. या वेळी देखील चायना पीआर संघाने वेगवान सुरवात केली होती. सामना सुरू होऊन काही सेकंद होत नाही, तो चायना पीआर संघाने गोल करण्याची संधी निर्माण केली होती. वु चेंगुशु हिने टँग जिलाईकडे पास दिला होता. मध्यरक्षक म्हणून खेळणाºया चायना पीआर संघाच्या टँग हिची किक कोरिया रिपब्लिक संघाची गोलरक्षक किम जुंग मी हिने परतवून लावली. यानंतरही चायना पीआर संघाचे आक्रमण चालूच राहिले. त्यामुळे कोरियावरील दडपण वाढले होते. झँग शिन हिने ३५ यार्डावरून मारलेली किक बाहेर गेली. दहाव्या मिनिटाला वंग शुआंग हिचा गोल करण्याचा असाच एक प्रयत्न किमने हाणून पाडला.
कोरिया रिपब्लिक संघाने पूर्वाधार्चा अर्धा वेळ संपल्यावर खेळावर नियंत्रण राखायला सुरवात केली. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला मिळालेली पहिलीच संधी त्यांनी सार्थकी लावली. ली जेऊम मिन हिने बचाव भेदून चायना पीआरच्या गोलकक्षात धडक मारली. तिने संधी साधून चोए यु री हिच्याकडे पास दिला आणि तिने चेंडूला जाळीची दिशा दिला. हा कोरिया रिपब्लिकचा पहिला आणि स्पर्धेतला शंभरावा गोल ठरला. आघाडी घेतल्यानंतर मात्र कोरिया रिपब्लिकच्या आक्रमणाला धार चढली होती. गोलरक्षक झोऊ यु हिच्यामुळे चायना पीआर संघावर आणखी गोल चढू शकला नाही. लिआन सेऑन जू हिचे हेडर तिने शिताफीने अडवले. त्यानंतर धसमुसळ्या खेळाने चायना पीआर संघाला मोठा फटका बसला. पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतल्यावर कोरिया रिपब्लिक संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. चायना पीआर संघाच्या याओ लिंगवेई हिने चेंडू हाताळल्याचे निष्पन्न झाले. पेनल्टीची ही संधी जी सो युन हिने अचूक साधली आणि कोरिया रिपब्लिक संघाला २-० गोल अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
चायना पीआर संघाचे प्राशिक्षक शुई क्वींगझिया यांनी झिआओ युई आणि झँग रुई यांना उत्तरार्धाच्या सुरवातीपासून मैदानात उतरवले. त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. या दोघींच्या खेळाने चायना पीआर संघाला पुन्हा सामन्यात आणले. तरी कोरिया रिपब्लिकच्या बचाव फळीने त्यांना सुरवातीला फारशी संधी दिली नाही. त्यांच्या प्रयत्नांना तेव्हा यश आले तेव्हा कोरिया रिपब्लिकच्या ली यंग जु हिने चेंडू हाताळल्याने चायना पीआर संघाला पेनल्टी मिळाली. सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला टँग हिने ही संधी साधून चायना पीआर संघाचा पहिला गोल केला.
या गोलने प्रेरणा घेत चायना पीआर संघाने खेळाची सुत्रे पुन्हा एकदा आपल्याकडे घेतली. कोरिया रिपब्लिकच्या बचावफळीने या आक्रमणाचे दडपण घेतले आणि त्यांच्याकडून चुका होऊ लागल्या. टँगने कोरिया रिपब्लिकच्या दोन बचावपटूंना चकवून मुसंडी मारली आणि गोलपोस्टच्या जवळ सहा यार्डावर असणाऱ्या झँग लिनयान हिच्याकडे सुरेख पास दिला. तिनेही ही संधी दवडली नाही आणि चेंडूला जाळीची दिशा देत बरोबरी साधली. सामन्याच्या अखेरच्या सत्रात कोरिया रिपब्लिकचे खेळाडू काही धोका निर्माण करतील याची वेळच चायना पीआरच्या आक्रमकांनी येऊ दिली नाही. कोरिया रिपब्लिकच्या खेळाडूंची देहबोली असेच काहीसे दाखवत होती. पण, चायना पीआरच्या बचावफळीने त्यांना रोखून धरले. त्यानंतर वँग शानशान हिच्या सहाय्याने वँग युई हिने अखेरच्या टप्प्यात गोल करून कोरिया रिपब्लिकच्या प्रयत्नांवर पाणी फेरले.