पुणे दि २९ :- परिषतआयुष्यात यशस्वी होण्यासाठी उच्च आकांक्षा ठेवा, खडतर परिश्रम करा, मर्यादित ध्येय ठेवू नका, आत्मसंतुष्ट राहू नका, रोज नवे शिकण्याचा ध्यास ठेवा, चिकाटीसह कामात सातत्य ठेवा, अंगात नम्रता बानवा असा ‘माशेलकरी मंत्र’ आदिवासी मुलांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज दिला.शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकलव्य विज्ञान परिषद 2019’ चे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तत्ज्ञ डॉ. माधव गोडबोले होते. यावेळी मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. माधव देव, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नातू, तरुण खगोल संशोधक श्वेता कुलकर्णी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन संस्थेच्या संचालक डॉ. रिता मुल्हेरकर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसध्वज सोनावणे, प्रकल्प संचालक माधुरी यादवाडकर उपस्थित होत्या.डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, विज्ञान हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकच नसते, हा विज्ञानाचा मूलभुत सिध्दांत आहे. विज्ञानातून मिळालेले सर्वात स्वस्त आणि सुलभ उत्तरच आपण व्यवहारात वापरतो. त्यामुळे मानवी कल्याणाचे संशोधन विज्ञानाच्या माध्यमातून होणे अपेक्षीत आहे.मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर असावा, मुले कृतीतून आणि निरिक्षणातून शिकत असतात, असे सांगत शालेय जीवनात शाळेतील एका प्रयोगादरम्यान
आपल्याला विज्ञानाची गोडी लागल्याचा किस्सा डॉ. माशेलकर यांनी सांगितला. तसेच मुलांना कायम प्रश्न पडत रहावेत आणि शाळेसह घरात त्यांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असावे. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. कुतुहला शिवाय विज्ञान पूर्ण होत नाही. मुलांमध्ये नवसर्जनशीलता निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगत “पॉवर ऑफ बजेट पेक्षा पॉवर ऑफ आयडीया” महत्वाचे असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.डॉ. माधव गोडबोले म्हणाले, प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरिक्षण करून त्याचा तर्कशुद्ध अर्थ लावणे हा विज्ञानाचा गाभा आहे. विज्ञान हे अुनभवावर आधारित असते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या निकषावर पडताळून पहावी. विज्ञानाच्या अभ्यासाला अनेक पैलू असून निसर्गात काय सुरू आहे, याचे निरिक्षण करणे हे सुध्दा विज्ञानच आहे. आत्मसन्मान हाच मानवाचा मोठा ठेवा आहे, विज्ञानाच्या आधारे हा आत्मसन्मान वाढण्यास मदत होते. आदिवासी समाज हा सर्वाधिक निसर्गाच्या जवळ असतो, त्यांना निसर्गाकडून उपजतच ज्ञान मिळत असते. त्यामुळे आदिवासी मुलांनी हा ठेवा विज्ञानाच्या चौकटीत बसवून समाजाचा विकास साधण्याचे अवाहन डॉ. गोडबोले यांनी केले.यावेळी डॉ. रिता मुल्हेरकर, माधुरी यादवाडकर, डॉ. नातू, डॉ. माधव देव, श्वेता कुलकर्णी यांची भाषणे झाली. डॉ. माशेलकर यांच्या हस्ते श्वेता कुलकर्णी यांच्या खगोलशास्त्राच्या चित्रफितींचे उद्घाटन झाले.या वेळी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातील एकलव्य आदिवासी स्कूलच्या मुलांनी तयार करून मांडलेल्या संशोधन प्रकल्प मॉडेलची पाहणी डॉ. माशेलकर यांनी केली. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला.आभार आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी मानले. या कार्यक्रमाला एकलव्य आदिवासी स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.