पुणे,दि.१२ :- पुण्यात एका सेवानिवृत्त शास्त्रज्ञाला उच्चशिक्षित दाम्पत्याने गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने तब्बल 1 कोटी 16 लाख 52 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला.ही घटना 2 एप्रिल 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी पुणे शहर पुणे सायबर पोलिसांनी जितेंद्र शेडगे व प्रीती शेडगे या दाम्पत्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बकुळ अपार्टमेंट नागपूर येथील 62 वर्षीय शास्त्रज्ञाने फिर्याद दिली आहे. जितेंद्र शेडगे याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आहेत. तर, आरोपी शेडगे याचे संगणकीय शिक्षण झाले आहे. त्याने पत्नीच्या नावावर डोमेन खरेदी केले. त्यानंतर 2015 मध्ये आरोपीने पुणे सीटी डिल्स डॉट कॉम नावाची वेबसाइट सुरू केली. सुरुवातीला ते लाइटबिल, मोबाईल रिचार्ज हे कॅश बॅक सुविधेच्या नावाखाली नागरिकांना सेवा देऊ लागले.
एखाद्या व्यक्तीने त्यांच्यामार्फत एक हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज केले, तर त्यांना ठरावीक रोख रक्कम आरोपी परत देत होते. त्यामुळे परतावा मिळत असल्यामुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे जोडले जाऊ लागले. मात्र, ही परताव्याची योजना नसून फसवणुकीचा ट्रॅप आहे, हे अनेकांना लक्षात लक्ष लशात आले नव्हते. प्राथमिक टप्प्यात त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाल्यानंतर आरोपींनी 2019 मध्ये विविध नावाने गुंतवणुकीच्या योजना ऑनलाइन टाकण्यास सुरुवात केली.
नागरिकांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केल्यानंतर पहिली काही वर्षे त्यांनी पैसे परतदेखील दिले. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढत गेला. वेबसाइटच्या माध्यमातून फिर्यादी शास्त्रज्ञाला शेडगे दाम्पत्याच्या गुंतवणूक योजनेची माहिती मिळाली. त्यांनी आरोपींशई संपर्क साधला असता, जादा परताव्याच्या आमिषाने फिर्यादींना आरोपींनी आपल्या जाळ्यात खेचले.
फिर्यादींनी आरोपींवर विश्वास ठेवत दोन वर्षांत त्यांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यातून व क्रेडिट कार्डवरून एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 1 कोटी 16 लाख रुपये आरोपींच्या हवाली केले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर देखील अपेक्षित पैसे परत मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी आरोपींशी संपर्क केला, त्या वेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
फिर्यादींनी सायबर ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. दाखल तक्रार अर्जाची चौकशी करून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपींनी गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचा पोलिसांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेडगे एक महिन्यापासून राहत होता घर बदलून
अनेकांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर शेडगे हा घर बदलून दुसर्या परिसरात वास्तव्य करीत होता. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलिस कर्मचारी शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, पुंडलिक आणि पूजा मांदळे यांच्या पथकाने त्याला धायरी परिसरातून अटक केली.
गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने आरोपींनी ही फसवणूक केली आहे. गुन्हा दाखल करून जितेंद्र शेडगे याला अटक करण्यात आली आहे. जर अशाप्रकारे कोणाची आरोपींकडून फसवणूक झाली असेल, तर त्यांनी सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
– कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, सायबर