पिंपरी, दि १२:– पिंपरी चिंचवड परिसरात सर्रासपणे सुरु असलेले मटका, लॉटरीच्या नावाखाली चाललेये सोरट, व गावठी दारु अड्डे तसेच इतर अवैधधंदे त्वरीत बंद करुन पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी करा आणि शहर परिसरात कायदा सुव्यवस्था राखा नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा छावा मराठा संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना दिला आहे.
सध्या पिंपरी चिंचवड शहर परिसरात राजरोसपणे सर्व प्रकारचे अवैधधंदे सुरु आहेत. त्यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. पोलिसच अवैधधंदे करणाऱ्या माफीयांना अभय देत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. अवैधधंद्यांमुळे गरीब कुटुंबातील तरुण पिडी, अल्पवयीन मुल आणि बहुसंख्यीत गरीब कुटुंबातील लोक वेसनाधीन होऊ लागले आहेत. ज्या ठिकाणी अवैधधंदे सुरु असतात ते ठिकाण गुन्हेगारी कारवायांचे अड्डे बनले आहेत. या ठिकाणी गुंड प्रवृतीच्या लोकांचा सर्वाधिक वावर असतो. ज्यामुळे मारमारी, खुन या सारख्या घटना घडतात आणि शहराची शांतता भंग होते. तसेच सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होते. या अवैधधंद्यांच्या नादी लागून कित्येक कुटुंब उद्वस्त होतात, रस्त्यावर येतात.
स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश होता शहर परिसरातील गुन्हेगारी कमी करणे मात्र पोलीसांकडून त्या दिशेने कुठल्याही प्रकारची कडक कारवाई अद्याप तरी झालेली दिसत नाही. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसुलदार म्हणून नेमलेले पोलीस अवैध धंद्यांना परवानगी देत सुटले आहेत. तर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा हिस्सा असल्याचे सांगून सरासपणे वसुली सुरु आहे. ज्यामुळे अवैधधंदे करणारे माफीया फोफावले आहेत. यामुळे शहर परिसरातील सर्व प्रकारच्या अवैधधंद्यांवर त्वरीत कारवाई करुन शहरातील कायदा सुव्यस्था राखावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच असे न झाल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा छावा मराठा संघटनेने दिला आहे.