पुणे,दि.०८:- ट्रेड पे कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मित्राने मित्राविरुद्ध फिर्याद दिली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार मे 2021 ते बुधवार (दि.6) या कालावधीत घडला आहे.ओपिंदरसिंग प्रधानसिंग कांत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुभाष वसंत खराडे (वय 65, रा. भोसलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 406, 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपी याची ट्रेड पे कंपनी असून, त्याने फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. तसेच गुंतवलेल्या पैशावर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून 10 लाख 35 हजार 800 रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने दोन चेक दिले.फिर्यादी यांनी आरोपीने दिलेले चेक बँकेत जमा केले. मात्र, ते बाऊन्स झाले.त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणे देत रक्कम देतो असे सांगितले.परंतु अद्यापपर्य़ंत पैसे न देता फसवणूक केली. याबाबत फिर्य़ादी यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.तक्रार अर्जाची चौकशी करून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर करीत आहेत.