पुणे,दि.११ : – पुण्यात कोयता गँगला आवर घालण्यासाठी “स्पेशल स्कॉड ” ची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे कोयत्याने पुणेकरांवर दहशत माजविणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाणार आहे, पुण्यात गाजत असलेल्या कोयता गँगबाबत आज पुण्यातील वानवडीत येथे ३३ व्या महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ चे उद्घाटनप्रसंगी पत्रकारांना पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी ही माहिती दिली. पुणे पोलिसांकडून या स्कॉडची स्थापणा केली असून त्याद्वारे दहशत माजविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तांनी घेतलेली कोयता गँगची दखल
राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. २०२२ हे साल पोलीस दलासाठी चांगले गेले आहे. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तर, नक्षलविरोधी कारवाईत देखील चांगली बाब आहे. गडचिरोली तसेच गोंदिया भागातील कामगिरी उत्तम आहे. पुण्यातील कोयता गँगबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, कोयता गँगची दखल पोलीस आयुक्तांनी घेतलेली आहे. त्यांनी स्पेशल स्कॉडची नेमणूक केली आहे. या गुन्ह्यांना पायबंद कसा घातला जाईल, याबाबतची उपाययोजना सुरू केली आहे. लवकरच पुण्यातील कोयता गँगला पायबंद घातला जाईल.
पुण्यातील वानवडीत असणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे होत असलेल्या ३३ व्या महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ चे उद्घाटन पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.