पुणे,दि३१ :-पुणे शहरांतील वाहतूक पोलिसांचा वाहतूक नियमनाचा प्रयत्न सुरु असला तरी शहराच्या मध्य वस्तीमध्ये वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निवेदन महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान चे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे उप शहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना दिले.
रस्त्यावरील मार्गिकेची शिस्त राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या मदतीने आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत.सीसीटीव्ही बसवावेत,अतिक्रमणे हटविण्यासाठी संयुक्त मोहीम ३ महिन्यांनी राबवावी,जड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेतच प्रवेश द्यावा,वन वे रस्त्यांच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी,वर्दळीचे रस्ते नो हॉकर ,नो पार्किंग झोन घोषित करावेत असे या निवेदनात म्हटले आहे.
पुणेकर नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत ,या प्रयत्नांना गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांचा पाठिंबा राहील ,असे मालुसरे यांनी सांगितले. या भेटीदरम्यान वाहतूक नियमनातील अहर्निश सेवेबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा संत तुकाराम महाराज पगडी,शाल,मंडई च्या छायाचित्राची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जितेंद्र राऊत,हर्षद मालुसरे आदी उपस्थित होते .