पिंपरी चिंचवड,दि१२:- : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंप जवळ बॅरिगेड लावून नाकाबंदी करण्यात येत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा हद्दीत येणाऱ्या वाहनांची सांगवी पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सांगवी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. विविध रस्त्यांवर सायंकाळच्या सुमारास वाहनचालकांची, वाहनांची तपासणी करून नोंद घेतली जात आहे.
चिंववड विधानसभा मतदार संघात येत्या २६ तारखेला मतदान प्रक्रिया होणार आहे. साडेपाच लाखाहून अधिक मतदार असणारा हा मतदारसंघ आहे. पवना नदीच्या दोन्ही भागात याचा विस्तार आहे. पूर्वेला सांगवीपासून ते पश्चिमेला रावेत पर्यंत व दक्षिणेस वाकडपासून ते उत्तरेला दळवीनगर, बिजलीनगर पर्यंत याचा विस्तार आहे. या हद्दीत पोलिस अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत. मुख्य रस्त्यावर बॅरिगेड लावून नाका बंदी करण्यात येत आहे. या ठिकाण विशेष पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळी व सायंकाळी सांगवी, पिंपळे गुरव याठिकाणी चारचाकी वाहने तपासणी साठी थांबविली जात आहेत. संपूर्ण गाडीची तपासणी केली जात असल्याने काही वाहनचालक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी सुरु असल्याचे सांगवी पोलिसांकडून यावेळी सांगितले जात आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी हद्दीत पेट्रोलिंग वाढविले आहे. पोलिस अधिकारी स्वतः परिसरात फिरत असून विशेष माहिती घेत आहेत. संवेदनशील भागात विशेष लक्ष दिले जात आहे. याप्रसंगी सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस उपनिरीक्षक मिनीनाथ वरुडे, पोलीस हवालदार राजेंद्र साबळे, पोलीस हवालदार संजय डामसे आदी पोलीस अंमलदार उपस्थित होते.