पुणे,दि.२४:- पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज शुक्रवारी दि.२४ रोजी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केला.यामध्ये पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
यंदाचे बजेट हे ९५४५ कोटींचे आहे. पुणे महापालिकेच्या २०२२-२३चा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटींचे सादर केला होता. त्यामुळे चालू वर्षीच्या बजेटमध्ये थेट थेट एक हजार कोटींची वाढ झाली आहे. नवीन 23 गावांच्या समावेशामुळे बजेटमध्ये यावर्षी वाढ झाली आहे.
गतवर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली आहे. त्या खालोखाल रस्त्यांसाठी ८०० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन व प्रकल्प साठी ५९० कोटी रुपये तर पीएमपीएल साठी ४५९ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. पाणी पुरवठ्यासाठी १३२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तर शहरातील मलिनिसरणासाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटी जाहीर करण्यात आले आहेत. पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये तर आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार असल्याची घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद देखील केली आहे. तसेच पगार आणि पेन्शन वर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार आहेत.