पुणे,दि.११:- मोबाईल मध्ये बिंगो अॅपच्या माध्यमातून जुगार खेळून लाखो रुपये हरल्यानंतर घोरपडीतील सोपानबागेतील बंगल्यात लाखोंच्या ऐवजाची घरफोडी करणार्या व 35 गुन्हे दाखल असलेल्या घरफोड्याला व चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी मदत करणार्या एका सोनाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने अटक केली आहे
त्याच्या चौकशीत 20 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुकेश बबन मुने (वय 26, कोथरूड व त्याचा साथीदार नितीन सुरेश बागडे (वय 32, रा. नालेगाव, अहमदनगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुकेश हा सराईत घरफोडी करणारा आहे, तर बागडेचे सोनाराच्या दुकान कामाला होते.
मार्च 2023 मध्ये घोरपडीतील एका बंगल्यात बंगला नूतनीकरणाचे काम चालू असताना अज्ञात चोरट्यांनी 40 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 5 कडून 100 हून अधिक सराईत घरफोडी करणार्यांची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, हा गुन्हा मुकेश मुने याने केल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो सध्या ठाण्यातील भिवंडी येथे राहण्यास गेल्याचे समजले. त्याचा ठाण्यात शोध घेत असताना त्याचा मित्र नितीन बागडे याच्यासोबत पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघे खराडी चौकात आले असता दोघांनाही युनिट 5 च्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी हा ऐवज अहमदनगर येथील एका सोनारांना विकल्याचे सांगितले. सोनार तसेच आरोपींकडून 20 लाख 92 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा, पो. निरी. कृष्णा बाबर, अविनाश लोहोटे पोलीस अमंलदार, रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.