.पुणे, दि,१५ :- निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी (झोनल ऑफीसर) हा महत्त्वाचा घटक असून निवडणूक कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये उत्तम समन्वय असला तर निवडणूक योग्य पध्दतीने पार पडली जावू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
जिल्हाधिकारी राम हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदार संघाचा दौरा करत असून विविध मतदान केंद्रांना भेट देत आहेत. या दरम्यान, मतदान केंद्रांची पहाणीही ते करत आहेत. आज त्यांनी भोर येथे पहाणी दौरा आयोजित केला होता. त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे होते. भोर येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेतली. यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार अजित पाटील, मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, वेल्ह्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे, गट विकास अधिकारी संतोष हराळे, मुळशीच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील, वेल्ह्याचे गट विकास अधिकारी मनोज जाधव, पोलीस निरीक्षक राजू मोरे, यशवंत गवारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांनी क्षेत्रीय अधिका-यांची ओळख करुन घेतली. प्रत्येक अधिका-याकडे असलेल्या मतदान केंद्रांची माहिती घेवून तेथे असलेल्या मुलभूत सुविधांबाबत विचारणा केली. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्हीव्हीपॅटचे कार्य कसे चालते, याबाबतही त्यांनी माहिती विचारली. यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी त्याचे अद्ययावत ज्ञान आणि हाताळणी बाबत दक्ष रहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, भरारी पथक, सी-व्हीजील अॅप, मतदान यंत्रांची सुरक्षितता, वाहतूक आराखडा याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेत पोलीस यंत्रणेचे संपूर्ण सहकार्य राहणार असून क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी एकमेकांमध्ये योग्य समन्वय आणि सुसंवाद ठेवावा, असे आवाहन केले. भोर परिसरात काही ठिकाणी मोबाइल किंवा इंटरनेट सुविधा नाहीए, तेथे वॉकीटॉकी सारखी सुविधा उपलबध करुन दिली जाणार असून याबाबत हाताळणीचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी विविध कक्षांना भेट दिली. तसेच यावेळी भोर तालुकयातील कर्नावड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदान जागृती पथनाटयाचे कौतुक केले.