पुणे दि,२५ : – बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता जमीन वादामध्ये बाजुने निकाल देण्यासाठी एका खाजगी वकिला मार्फत १ कोटी ७० लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अखेर भुमी अभिलेखचा उपसंचालक बाळासाहेब वामनराव वानखेडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टी करप्शन) अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दि. २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी ७० लाख रूपयाच्या लाच प्रकरणी खासगी वकिल रोहित शेंडे याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयात भुमि अभिलेखचा उपसंचालक बाळासाहेब वानखेडे याला आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने वानखेडेचा अटकपुर्व जामिन फेटाळला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन वानखेडे फरार होता. अखेर आज अॅन्टी करप्शनच्या पथकाने बाळासाहेब वानखेडेला अटक केली आहे. त्याला शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन घेतला आणि बाळासाहेब वानखेडेला दि. २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा अधिक तपास अॅन्टी करप्शनमधील पोलिस उपाधिक्षक दत्तात्रय भापकर करीत आहेत.