पुणे दि,०३ : – महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या उरूळी कांचन उपविभागीय कार्यालयात ग्राहक दाखला देण्यासाठी १६० रुपयांची लाच घेताना महावितरणचा उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
सचिन मुकुंद थोरात (वय ३२ वर्षे, उपकार्यकारी अभियंता कार्यालय, उरळीकांचन उपविभाग ) असे पकडलेल्याचे नाव आहे.तक्रारदार यांनी ग्राहक दाखला मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या उरूळी कांचन उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी त्यांनी मागणी केलेला ग्राहक दाखला देण्याकरिता सचिन थोरात याने त्यांच्याकडे १६० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी अँटी करप्शनकडे याची तक्रार केली. त्यानंतर याची पडताळणी केल्यावर पथकाने सापळा रचून त्याला तक्रारदाराकडून १६० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई अँटी करप्शनचे पुणे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम बळप, पोलीस हवालदार दिपक टिळेकर सहायक पोलीस फौजदार ढवणे, पोलीस शिपाई प्रशांत वाळके यांच्या पथकाने केली.
एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यासंदर्भात अँटी करप्शनच्या १०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.