मुंबई दि,२९:- देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं या अधिवेशनाचं यजमानपद स्वीकारलं आहे.देशभरातून अडीच हजार पत्रकार या अधिवेशनास उपस्थित राहतील असा विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.या अधिवेशनाच्या प्राथमिक तयारीसाठी नांदेड येथे 30 जून रोजी एक व्यापक बैठक होत असून या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनी दिली .
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन 27 आणि 28 जुलै रोजी होणार असल्याचे यापुर्वी जाहीर कऱण्यात आले होते.मात्र स्थानिक पातळीवर हॉलची उपलब्धता या तारखांना होत नसल्याने तारखेत बदल करून ते 17 आणि 18 ऑगस्ट रोजी घेण्याचे नक्की झाले आहे.नांदेड येथील मालेगाव रोडवर असलेल्या भव्य भक्ती लॉन्सवर हा अधिवेशऩाचा दिमाखदार सोहळा होत असून येथे 1500 लोक बसू शकतील असा भव्य हॉल उपलब्ध आहे.या सोहळ्यासठी राज्यभरातूून आणि देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन दर दोन वर्षांनी नियमितपणे होत असते.यापुर्वी 2011 मध्ये रायगड जिल्हयात रोहा येथे,2013 मध्ये औरंगाबाद येथे,2015 मध्ये पिपरी-चिंचवड येथे 2017 मध्ये शेगाव येथे अधिवेशन झाले होते.2019 मध्ये हे अधिवेशन नांदेड येथे होत आहे.नांदेडला मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन होण्याची ही दुसरी वेळ असून 1998 मध्ये नांदेडला अधिवेशन झाले होते.त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी हे अधिवेशन नांदेडला संपन्न होत आहे.
शेगाव अधिवेशनासाठी 2000च्यावर पत्रकार उपस्थित झाले होते.नांदेडला विमान सेवा आहे,तसेच रेल्वे आणि रस्ता मार्गे नांदेडला जाणे सोयीचे असल्याने नांदेड अधिवेशनासाठी अडीच हजार पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.मराठी पत्रकार परिषद ही देशातील पत्रकारांची अशी एकमेव सस्था आहे की,ज्याचे अधिवेशऩं नियमितपणे होतात आणि त्याला एवढया मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित असतात.नांदेडसाठी पुणे आणि मुंबई येथून थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यातील पत्रकारांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत.पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पुन्हा एकदा सरकारवर दबाव वाढविण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून हा कायदाही सरकारला करावा लागणार आहे.त्यामुळं नांदेडचे या अधिवेशऩात पत्रकारांचा अधिक उत्साह बघायला मिळेल.दोन दिवस चालणार्या या अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 17 च्या रात्री पत्रकारांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात येणार आहे.
देशातील मराठी पत्रकारांसाठी वैचारिक पर्वणी ठरणार्या या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम.देशमुख विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी कार्याध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस अनिल महाजन, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी कोषाध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष विजय दगडू ,विभागीय चिटणीस विजय जोशी आणि प्रमोद माने तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर,कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे,सरचीटणीस सुभाष लोणे,नांदेड महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख आदिंनी केले आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी