बिलोली दि, ०५ :-बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे शहरातील एका युवकास विषारी अशा किंग कोबरा जातीच्या सापाने दंश केला.हातास सापाने दंश केल्यानंतर ज्या सापाने हातास दंश केला त्या सापासह गंभीर जखमी झालेल्या युवकाने गंजगाव ते बिलोली असा प्रवास करून सापासह थेट रूग्णालय गाठल्याची घटना दि.३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
बिलोली शहरातील गांधी चौक परिसरात राहणारा बालाजी विठ्ठल पांचाळ हा युवक काही कामा निमित्त याच तालुक्यातील गंजगाव येथे गेला असता तेथे बालाजी पांचाळ यास भारतात आढणा-या विषारी प्रजातीच्या सापातील किंग कोबरा या सापाने दंश केला. सापाने हातास दंश करताच पांचाळ याने विषारी अशा सापासह गंजगाव हून थेट बिलोली शहरातील डाँ.नागेश लखमावार यांचे रूग्णालय गाठले.रक्ताने माखलेल्या युवक व त्याच्या हातातील जवळपास ५ फुटाचा साप पाहून रूग्णालयातील रूग्ण रूग्णालयातुन पळतच बाहेर पडले.सर्प दंशामुळे बालाजी पांचाळ या रूग्णाची झालेली गंभीर अवस्था पाहून डाँ.लखमावार व मारोती नामक कंपाऊन्डरने रूग्णाच्या हातातील ५ फूटी साप बाजूला सारून पांचाळ याचेवर लखमावार यांनी तात्काळ उपचार करून बालाजी पांचाळ या रूग्णास पुढील उपचारार्थ नांदेड येथे पाठवले.
दुपारची वेळ असल्याने रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या सर्व दुकानातील व्यापारी व नागरिक आपआपल्या कामात मग्न असतांना अचानक दुचाकीवरून येणाऱ्या युवकांपैकी एकाच्या हातातील जिवंत विषारी साप पाहून डाँ.लखमावार यांच्या रूग्णालयासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रूग्णावर डाँ.नागेश लखमावार यांनी केलेल्या योग्य उपचारामुळे रूग्णाची प्रकृती सुधारत असून रूग्णावर सध्या नांदेड येथे उपचार सुरू आहे.
बसवंत मुंडकर