बोरघर / माणगांव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एकंदरीत सर्व प्रकारच्या महत्वपूर्ण कागद पत्रात उदाहरणार्थ जन्म मृत्यू दाखला, शाळा सोडल्याचा दाखला अर्थात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट,जातीचा दाखला, रेशनकार्ड, जमीन सातबारा, आठ अ,फेरफार, आधारकार्ड, वोटिंग कार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबुक इत्यादीं मध्ये त्या त्या ठिकाणच्या संबंधित कार्यालयातील कर्मचारी, लेखनिकांनी, अधिकारी वर्गाने आपापल्या हस्ताक्षरीय मराठी,इंग्रजी लिखाणाच्या -हस्व दीर्घ, कानात, मात्रा, वेलांटी, उकार व्याकरणाची ऐसी की तैसी करुन ( कोणत्याही प्रकारची शुद्ध लेखण शिस्त न पाळता)
त्या त्या काळात नागरिकांच्या नाव,आडनाव,जन्म तारीख, गाव, ठिकाण, नाते संबंध इत्यादी बाबींमध्ये लिखाणाच्या बाबतीत अत्यंत बेजबाबदार पणे केलेल्या अक्षम्य चुकांच्या हलगर्जीपणा मुळे केलेल्या शाब्दिक चुका, स्पेलिंग मिस्टेक आजच्या अत्याधुनिक संगणकीय युगातील लिंकिंग प्रणाली ( सिस्टम) मध्ये सदर महत्त्वाची कागदपत्रे एक दुसऱ्याशी शब्दशः तंतोतंत मॅच होत नसल्याने त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या चुका आजला सर्व सामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व प्रकारच्या कामकाजात ठीक ठिकाणी त्रासदायक ठरून फुकटची डोकेदुखी ठरत आहे.
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक काळात बदलत्या काळानुसार भारताने क्रांतीकारी निर्णय घेत आपल्या शासन प्रशासन व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी देशातील सर्व प्रकारच्या खात्यांमधील जुन्या प्रकारची कार्यप्रणाली अद्ययावत करण्यासाठी संगणीकृत कार्यप्रणालीचा अवलंब केला आहे. त्यामुळे आता सर्व क्षेत्रातील दैनंदिन कामकाज संगणीकृत होताना दिसून येत आहे.
देशातील संगणकीकरणाच्या या कार्यप्रणालीत सर्व प्रकारच्या जुन्या कागद पत्रांना अद्ययावत करताना संगणकीय सिस्टम मध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना त्या त्या सरकारी निमसरकारी कर्मचारी वर्गाला सामोरे जावे लागत आहे. डिजिटलायझेशनच्या या प्रक्रियेत विशेष करून नेटवर्क प्राॅब्लेम्सचा मोठ्या प्रमाणात अडसर येत आहे. कधीकधी तासनतास नेटवर्क नसल्याने कर्मचारी वर्गाची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना तासंतास संगणका समोर सिस्टम बसावे लागते. तर दुसरीकडे शासनाच्या बायोमेट्रिक सिस्टमला सामोरी जाताना सर्व सामान्य नागरिकांना त्यांची खाजगी कागदपत्रे या कार्यप्रणालीशी लिंक करुन घेताना नागरिकांच्या त्या अत्यंत महत्त्वाचा कागद पत्रात तत्कालीन कर्मचारी, लेखनिक, वा अधिकारी यांनी केलेल्या -हस्व, दीर्घ, काना, मात्रा, वेलांटी, उकार इत्यादी मराठी इंग्रजी अशुद्ध लिखाणातील अक्षम्य चुकांच्या हलगर्जीपणा मुळे सदर कागदपत्रे या कार्यप्रणालीत शब्दशः मॅच अथवा लिंक होत नसल्याने त्या कागदपत्रात अपेक्षित बदल करून घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना नाहक आपला अमुल्य वेळ, पैसा खर्च करुनही दुष्करसाध्य ठरुन नाहक फुकटची डोकेदुखी ठरत आहे. या सर्व प्रकारांना एकेकाळी जबाबदार असलेला वर्गच आजला सामान्य जनतेला नाहक वेठीस धरत आहे. या बाबतीत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून या बाबतीत विचार विनिमय करून संबंधित यंत्रणेला अधिसूचना देवून अशा प्रकारच्या चुकांच्या दुरुस्ती करण्यात शक्य तितकी शिथिलता आणून सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे.
( विश्वास गायकवाड )