मुंबई दि१६ : – महावितरण कंपनीने नुकत्याच काढलेल्या विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक पदाच्या भरतीच्या जाहिरातीत शिकाऊ उमेदवार व भजड संवर्गातील उमेदवारांना कमी जागा असल्याचा उल्लेख आल्याने या उमेदवारांमध्ये निर्माण झालेली अन्यायाची भावना लक्षात घेऊन सदर जाहिरात बिंदुनामावली तपासून आरक्षणाच्या नियमानुसार आरक्षित पदांची परत गणना करून सुधारित प्रकारे द्यावी असे पत्र राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.
महावितरण कंपनीकडून विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक या पद भरतीकरीता ४/२०१९ व ५/२०१९ ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना पद भरतीत २५ टक्के आरक्षण लागु करण्याचा निर्णय उर्जा विभागाने घेतलेला असूनही या बाबीचा विचार या भरतीत केलेला नसल्याने शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी फक्त १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, त्यात ठरल्याप्रमाणे वाढ करावी. तसेच ४/२०१९ या जाहीरातीनुसार केली जाणारी पदभरती ही राज्य शासनाच्या इतर पदभरतीप्रमाणे लेखी अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन त्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केल्यास दहावी उत्तीर्ण व आय.टी.आय धारक उमेदवार या दोघांनाही या भरतीकरीता अर्ज करणे शक्य झाल्याने कोणावरही अन्याय होणार नाही. ५/२०१९ या जाहिरातीत दर्शविल्यानुसार भ.ज. (ड)प्रवर्गातील उमेदवारांच्या आरक्षित पदांची संख्या कमी दाखविल्यामुळे या संवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. भरती केल्या जाणा-या एकूण पांच हजार पदांच्या २ टक्के आरक्षण हे भ.ज. (ड) प्रवर्गाकरीता असताना देखील फक्त ४४ पदे या संवर्गाकरीता आरक्षित दाखवलेली आहेत. बिंदुनामावली तपासून आरक्षणाच्या नियमानुसार आरक्षित पदांची परत गणना करावी व सुधारित जाहिरात देऊन या संवर्गास न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी