मुंबई :- दि. १८ ऑगस्ट – महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ पुन्हा एकदा सोमवार दिनांक १९ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ६ ऑगस्टला सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्हयात बागलाण येथे स्थगित करण्यात आली होती.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरग्रस्तांच्या मदतीस उतरली आणि अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पुरग्रस्तांच्या भेटीला उतरत पुरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत आणि त्यांचे तात्काळ पुनर्वसन कसे होईल यासाठी प्रयत्नशील आहेत.
पुरपरिस्थिती साधारण झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ पुन्हा सुरु होत आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होणार आहे.
या शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत.
उद्या सोमवारी पैठण येथे सकाळी 11 वाजता बाळानगर येथे , दुपारी 2 वाजता बदनापूर तर सायंकाळी 5 वाजता भोकरदन येथे यात्रेनिमित्त जाहीर सभा होणार असून वाशीम येथे मुक्काम असणार आहे.
१९ ते २६ ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे. शिवाय यापुढील यात्रेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
शिवसुराज्य यात्रा 23 ला परळीत तर बीड जिल्ह्यात 3 दिवस
दरम्यान ही यात्रा 23 ऑगस्ट रोजी परळीत येणार असून सायंकाळी सभा होणार आहे. ही यात्रा 3 दिवस बीड जिल्ह्यात असून 23 ला परळी, 24 रोजी अंबाजोगाई , माजलगाव तर 25 ऑगस्ट रोजी गेवराई, पाटोदा, बीड या तीन ठिकाणी सभा होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सांगितले.