पुणे, दि. ३१: – पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमध्ये बाधित कुटुबांना देण्यात येणा-या मदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तात्काळ अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज पुणे जिल्ह्यातील सन 2019 मधील अतिवृष्टी व पुरस्थि तीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्तआयुक्त शांतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुर परिस्थितीमध्ये मृत झालेले / वाहून गेलेल्या पशुधनाचे मालक असलेल्या बाधित शेतक-यांना दिलेल्या मदत वाटप, नुकसानग्रस्त छोटे व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांची संख्या व त्यांना मदत देण्याकरीता प्राप्त झालेल्या अनुदानाबाबत माहिती घेण्यात आली. घरांच्या नुकसानीबाबत, बाधित घरांसाठी घरभाडे मदत, पुरग्रस्त परिस्थितीमुळे शेतक-यांना पिकाच्या नुकसानीसाठी मदत देणे, पुरग्रस्तांना तात्काळ नवीन कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही, पुरग्रस्त भागामध्ये घरांच्या दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी वाळू व मुरुम उपलब्ध करुन देण्याबाबत, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसानीसाठी मदत बाधितांची संख्या, मदत वाटपासाठी प्राप्त झालेल्या निधीबाबत, अतिवृष्टीमुळे व पुरामुळे निराधार झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याबाबत, सानुग्रह अनुदान, निवारा छावणीमध्ये स्थलांतरीत केलेल्या व्यक्तींची संख्या व त्यांना वाटप केलेले अनुदान याची विस्तृत माहिती घेण्यात आली. तालुकानिहाय मयत व्यक्तींची संख्या व त्यांच्या कुटुंबियांना वाटप केलेल्या मदतीचा आढावाही या बैठकीमध्ये घेण्यात आला.
यावेळी उपस्थित अधिका-यांनी सादर केलेल्या माहितीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.