वडगाव मावळ दि,०७ :- मावळातील स्थानिक बेरोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने कान्हे-नायगाव परिसरातील तसेच संपूर्ण मावळ तालुक्यातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरूणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळत नसल्याने या हक्कच्या मागणीसाठी व कंपनीच्या तसेच प्रशासनाच्या विरोधात वडगाव मावळ येथे तहसील कार्यालयावर आज ( दि. ७) सकाळी ११ वाजता रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.स्थानिक भूमीपुत्र व बेरोजगार नागरीकांना रोजगार उपलब्ध व्हावा,मावळ तालुक्यातील सर्व एमआयडीसीमध्ये तसेच कान्हे-नायगाव परिसरात असलेल्या महिंद्रा ग्रुपच्या विविध कंपन्यांमधून स्थानिकांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात तसेच ८०टक्के प्राधान्य मिळावे, परप्रांतीयांना कायमस्वरूपी नोकऱ्या आहेत परंतु स्थानिक लोकांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा नोकरी मिळत नाही. तसेच ज्या कंपन्यामध्ये स्थानिक लोक कामाला आहे आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरी त्या ठिकाणी मिळावी आणि हा त्यांचा अधिकार आहे व तो अधिकार मिळालाच पाहिजे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मावळ तालुका कृती समिती च्या वतीने स्थानिकांना नोकरी व व्यवसायात प्रथम प्राधान्य मिळावे अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष बंडोबा सातकर त्यांनी केली.या साठी काढलेला मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके ,माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर विठ्ठलराव शिंदे, उपसभापती शांताराम कदम, जि.प. सदस्य नितीन मराठे, अलकताई धानिवले, तालुका शिवसेना प्रमुख राजू खांडभोर, कृती समितीचे अध्यक्ष बंडोबा सातकर , सचिव केतन सातकर, कान्हे-नायगाव मधील तसेच मावळातील नागरिक तरुण, महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी