पुणे दि.१२ : -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘आवडी’या कादंबरीवर आधारित ‘इभ्रत’चित्रपट हा सामाजिक संदेश देणारा असल्यामुळे सरकारने हा चित्रपट करमणूक करमुक्त करावा तसेच हे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे सरकारने स्वतः पुढाकार घेऊन राज्यातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी मातंग समाजाच्या अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली.यामध्ये माजी मंत्री रमेश बागवे , रीपबल्लिकन नेते हनुमंत साठे,शिवसेनेचे बाळासाहेब भांडे ,ज्येष्ठ विचावंत रमेश राक्षे,लहुजी परिषदेचे अनिल हतागले हे नेते सहभागी होते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे जगभर पोहोचले आहे. त्यांच्या साहित्यातील दलीत उपेक्षीत माणसाच्या वेदना ह्या प्रकर्षाने दिसून येतात. आत्तापर्यंत त्यांच्या
७ कादंबऱ्यांवर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर त्यांच्या लोकप्रिय ‘आवडी’ या कादंबरीवर आधारीत ‘इभ्रत’ हा मराठी चित्रपट उद्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या
चित्रपटामधून सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. आज रोजी देशभरात जातीमधील विषमता आणि माणूस माणसापासून दूर होत असताना या चित्रपटातील आशय आजच्या समाजाला उपयुक्त व दिशा देणारा ठरणार आहे म्हणून हा चित्रपट संपूर्ण राज्यभर टॅक्स फ्री करण्यासाठी
मातंग समाजातील सर्व संघटना व पक्षाचे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांची
भेट घेवून मागणी करणार आहेत.
____ या चित्रपटाचे पटकथा लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण क्षीरसागर, निर्माता वसंत दांडेकर, क्रिएटीव्ह डायरेक्टर लॉरेन्स क्षेत्रे, संगीतकार बबन अडागळे अशा मातब्बर मंडळीने या चित्रपटासाठी योगदान दिले आहे. या चित्रपटासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे यांनी विशेष सहकार्य केले आहे त्यामुळे हा चित्रपट तळागाळातील सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाला
महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.