पुणे दि ३० : – जागतिक स्तरावरील साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीकरिता गुजरात साहित्य अकादमी आणि मोटिव्हेशनल स्ट्रीप्स यांच्या वतीने लेखिका अनिता चितळे उर्फ शानिता विचारे यांना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मोटिवेशनल स्ट्रिप्स हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातले सर्वात मोठे साहित्यीकांचे पोर्टल आहे. अनिता यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. विष्णू पांड्या व शिजू पल्लीथझेठ यांचे आभार मानले.२०१९ मध्ये अनिता यांनी “सोजुन टू मालदीव” ही कादंबरी लिहिली. हि कादंबरी इंग्रजीमध्ये असून छापिल आणि ई-बुकच्या माध्यमातून १४३ राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध झाली आहे. या कादंबरीमध्ये त्यांनी प्रेमावर आधारित ‘लव्ह’ हि एक अतिशय सुंदर कविता लिहीली आहे. हि कविता ग्रीस, स्पेन या देशांत आगोदरच प्रसिद्ध झाली असून वाचकांना खूप आवडलेली आहे. २००९ मध्ये रिपब्लिक ऑफ मालदीव या बेटावर मिनीस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये त्यांनी काम केले आहे. या बेटावरून त्यांच्या मनावर तिथल्या वातावरणाचा परिणाम होऊन त्यांनी मालदीव या राष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, परिस्थितीच्या अनुभवातून त्यांनी ‘शोजुन टू मालदीव’ या कादंबरीचे लिखाण केले. त्याच वेळी त्यांना भारताचे माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची शालेय कामानिमित्त भेट झाली. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप यावेळी अनिता यांच्यावर पडली. २००९ ते २०१२ हा भारताच्या व मालदीवच्या राजकीय घडामोडींचा विशेष काळ होता. अशा काळात अनिता विचारे तेव्हा एकमेव भारतीय महिला मालदीव येथील एका दुर्गम बेटावर एकट्या राहत होत्या. हे दुर्गम बेट प्रवासाठी अत्यंत कठिण असूनदेखील त्या जिद्द आणि धाडस करुन तेथे राहत होत्या. मालदीव सोडल्यानंतर तेथील आलेले अनुभव अनिता या वेळोवेळी वेगवेगळ्या साहित्याद्वारे वाचकांपर्यंत पोहचवत आहेत. याचबरोबर अनिताजींनी कविता संग्रह याची निर्मिती केली असून तीसुद्धा लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यांनी ‘डोमेस्टिक व्हायलंस अगेन्स्ट वुमन’ या विषयावर अनेक कविता केल्या आहेत. तसेच त्यांनी जगामध्ये घडणा-या विविध विषयांवर कविता केल्या आहेत. त्या स्त्रीप्रधान कवयत्री असल्यामुळे महिलांच्या आदर्श बनल्या आहेत.अनिता यांनी शैक्षणिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूल (रेस कोर्स रोड) येथे त्या उपमुख्याध्यापिका होत्या. अनिता यांनी ए.डी.आय.एस(आण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल) स्कुलचा पाया घातला व तेथे त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून कारकीर्द गाजवली. शाश्वत ग्रामिण विकास या प्रकल्पावर त्यांनी काम केले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कर्तृत्वाचा प्रवास भारतातच नव्हे तर परदेशात पण उपयोगी आला. इंग्लंडच्या शहरातमधील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या, तेथे त्या इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना शिकवत होत्या.अनिता या वयाच्या अकराव्या वर्षापासून कविता लिहीत आहेत. त्यांना कविता व पुस्तक वाचनात खूप रुची आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल म्हणून निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट कर्नल(रि) लक्ष्मण चितळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत-चीन १९६२, भारत पाकिस्तान १९६५. भारत-बांगलादेश या लढाईत भाग घेतला होता. अनिता यांचा जन्म भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी झाला आहे व त्या स्वभावाने धाडसी, चौकश, कवि मनाच्या व स्वतंत्र वृत्तीच्या आहे. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे शिक्षण भारतातील विविध भागांमध्ये झाले. त्यांचे शालेय शिक्षण कॉन्व्हेंट स्कूल व केंद्रीय स्कूल मधून झाले आहे. शालेय जीवनात त्यांनी उत्कृष्ट वकृत्व अभिनयाचे बक्षीस मिळवले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी कला क्षेत्रातील पदवी घेतली, तर पुढील शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून केले. त्यांना शेक्सपिअरची नाटक सादर करायला फार आवडते.