पुणे दि ३१:- १ जानेवारी पासून पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी शनिवारी पत्रकार परिषद मध्ये स्पष्ट केले. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून गेल्या काही दिवसांपासून हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. नवीन वर्षांत या कारवाईची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील गंभीर स्वरुपाच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षांत पुणे शहरात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी महिन्याभरापूर्वी जाहीर केले होते. पुणे पोलिसांकडून नवीन वर्षांत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत वेंकटेशम यांनी शनिवारी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले,की हेल्मेटकडे सक्ती म्हणून पाहणे योग्य नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढते आहे. पुण्यात देखील रस्ते अपघात वाढत आहेत. महाविद्यालयीन युवक, नोकरदार युवक अपघातात बळी पडले आहेत. हेल्मेट परिधान केल्यास गंभीर स्वरुपाची दुखापत टळू शकते. पुण्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे. ज्या रस्त्यांवर अपघात होतात, त्या भागातील अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.आठ हजारांपेक्षा जास्त ‘कॉल’ पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात गेल्या वर्षी (२०१७) गंभीर तसेच किरकोळ स्वरुपांच्या अपघातांची माहिती आठ हजारांहून जास्त नागरिकांनी दिली होती. काही अपघात अगदी किरकोळ स्वरुपाचे होते. मात्र, पुण्यात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी दिली.