पुणे दि,१८:- साहित्यिक आपल्या समाजाच्या जडण-घडणीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक .उत्तम बंडू तुपे यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच समाजातील वंचित घटकांचे दुःख जगासमोर आणले. अनेकोनेक पुरस्कारांनी झालेल्या या प्रतिभावंत साहित्यिकाच्या हालाखीच्या परिस्थितीच्या वृत्ताची शासनाने दखल घेऊन, मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना तातडीने 5 लाख रुपये मदत मंजूर केली. गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी मदतीचा धनादेश काल १७ जानेवारी पुण्यातील त्यांच्या घरी भेट देऊन पुणे येथील निवासस्थानी भेट घेऊन सुपूर्द केला. यावेळी डॉ.पाटील यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. प्रतिभावंत साहित्यिक, कलाकार यांच्या पाठीशी शासन नेहमीच उभे राहील असे आश्वासन यावेळी दिले.
उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहेच पण उतारवयातील पॅरालिसिसमुळे त्यांची प्रकृतीही ढासळली आहे. त्यांच्या पत्नीलाही पक्षघात झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. हे पैसे आम्हा दोघा नवरा-बायकोच्या आजारपणासाठी वापरणार असल्याचं उत्तम बंडू तुपे यांनी यावेळी सांगितलं.
साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली आहे. मात्र त्यांच्या हलाखीच्या परिस्थतीकडे मात्र कोणाचं लक्ष नाही.
समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांना उतारवयात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घरातील साहित्य कमी आणि त्यांनी लिहलेल्या साहित्यामुळे मिळालेल्या पुरस्कार आणि पदकांची संख्याच जास्त आहे. हे पुरस्कार नीट ठेवायलाही त्यांच्याकडे पुरेशी जागा नाही.आयुष्यभर सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करताना तुपेंनी लिहलेलं साहित्य त्यांना मान सन्मान तर भरपूर देऊन गेलं. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र काही बदलली नाही. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवरील रॉयल्टीही त्यांना प्रकाशकांकडून मिळत नसल्याचं ते सांगतात.उत्तम बंडू तुपे यांची साहित्य संपत्ती कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले.भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आज यापैकी एकही पुस्तक त्यांच्याकडे दाखवायला देखील नाही.